केज | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी गावची कु. हिंदवी परमेश्वर चौरे हिने वर्ल्ड योगासना चॅम्पियनशिप 2026 मध्ये शानदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके जिंकून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. अहमदाबाद, गुजरात येथे 4 ते 8 जून दरम्यान झालेल्या या स्पर्धेत हिंदवीने “ट्रेडिशनल ग्रुप” आणि “फॉरवर्ड बेंडिंग” या प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले.
जगभरातील विविध देशांतील स्पर्धक सहभागी झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत हिंदवीने उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर भारताला गौरव मिळवून दिला. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिवाचीवाडी गावासह संपूर्ण केज तालुका आणि बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.